Ad will apear here
Next
कहाणी 'श्रावणी वीकएंड' व्रताची
 ऐक रे मनुजा, ही  'श्रावणी वीकएंड' व्रताची कहाणी! 
वैशाख वणवा सरे, आषाढ मेघ झरे, जलद बरसल्यावर धरतीचा ऊर पाण्याने भरे, अन मग श्रावणमास अलगद अवतरे! (निर्मळ मळे, उदकाचे तळे, बेलाचा वृक्ष, सुवर्णाची कमळे.... या धर्तीवर 'संपूर्ण चातुर्मास' मधील कहाणी आठवत वाचावे).   

अलवार, भुरभुरत्या, भिजवणाऱ्या पण चिंब नं करणाऱ्या पावसाच्या सरी... मधेच किरणांतून चमकणारी उन्हाची कोवळीक.... हवेतला हवाहवासा गारवा.... सृष्टीनं ल्यालेला हिरवा साज..... त्या हिरवाईतून वाट काढत उताराकडे झेपावणारे छोटे-मोठे फेसाळत्या पाण्याचे प्रवाह.... मधूनच नाकात भिनणारा भाजलेल्या मक्याच्या कणसांचा, भुईमुगाच्या शेंगांचा गोड वास.... 
चर्रर्रर्रर्र आवाज करत तळणीत उतरणारी आणि तेलाच्या बुडबुड्यांवर तरंगत खमंग-कुरकुरीत होत जाणारी कांद्याची भजी..... आणि या सगळ्यावर आले/मसाला घातलेल्या चहाचा पूर्णविराम!
श्रावण महिन्यातल्या सुट्टीच्या दिवशीची ही मज्जा; घरातून बाहेर पडून मोकळेपणी अनुभवण्याची. निसर्गाच्या हाकेला मनापासून साद-प्रतिसाद देण्याची. रोजच्या कंटाळवाण्या रहाटगाडग्यातून बाहेर पडायची संधी साधण्याची. 
'श्रावणी वीकएंड' व्रत सहकुटुंब सहपरिवार आचरण्याची. 

हा वसा कधी घ्यावा? श्रावणातल्या कुठल्याही रविवारी घ्यावा. 
व्रतसिद्धीसाठी काय करावं? आपल्या जिवलग मित्र-मैत्रिणी किंवा निकटवर्तीय नातेवाईकांना एकत्र करावं आणि दसऱ्याची/विजयादशमीची वाट नं बघता पंच पंच उषःकाली (ही व्याख्या व्यक्तिगणिक पहाटे ५ च्या पुढे कितीही वाजेपर्यंत लांबू शकते) खुश्शाल सीमोल्लंघन करावं. आपल्या जवळ जी स्वयंचलित वाहन व्यवस्था उपलब्ध आहे, तिचा न्यूट्रल गियर बदलून फर्स्ट-सेकंड-थर्ड गियर टाकत हळूहळू आनंदाचा मीटर स्पीड ने वाढवत न्यावा. या व्रतसिद्धीसाठी एखादं कमी गर्दीचं पण निसर्गसौंदर्यानं नटलेलं ठिकाण निवडावं. (माणसांच्या गर्दीनं फुललेली आणि ट्रॅफिक जॅम करणारी जागा व्रताचे फळ अज्जिब्बात नं देता मनस्तापास कारणीभूत होते, याची कृपया नोंद घ्यावी). श्रावण-सरींमध्ये भिजत मोकळा श्वास घ्यावा. हेवे-दावे, स्पर्धा, ईर्षा, असूया, संताप, अस्वस्थता, अतृप्ती, मुलांच्या शाळांचे गृहपाठ, प्रकल्प, कार्यालयीन कामांच्या 'डेडलाईनस', वरिष्ठ अधिकाऱ्यांचा खडूसपणा, इतर कार्यालयीन सहकारी दरवेळी पुकारत असलेला असहकार ... अशा सगळ्या नकारात्मक भावनांना आजूबाजूला झुळूझुळू वाहणाऱ्या प्रवाहांमध्ये सोडून द्यावं. मुक्त हस्ताने निसर्गाने केलेली सौंदर्याची-रंगांची मुक्त उधळण हात आखडता नं घेता 'दिल'से अनुभवावी. 

इतरांना उपद्रव होणार नाही अशा रीतीने पाण्यात डुंबणे, उड्या मारणे, धावणे-पळणे-चालणे-खेळणे इ. ज्याने सगळ्यांनाच खराखुरा आनंद मिळेल अशा सामूहिक कृती कराव्यात. या व्रतामध्ये 'अपेयपान' पूर्णपणे वर्ज्य करावं. चहा मात्र हवा तेवढा आणि हव्या तेवढ्या वेळा घेण्यास हरकत नाही. सोबत डबे नेले असतील तर उत्तमच! नाहीतर जिथे गेलोय तिथे जे उपलब्ध असेल ते झकास मूड मध्ये फस्त करावं. 
हे सगळे सहवासाचे- मौजमजेचे- उत्साहाचे क्षण आपल्या स्मृतींमध्ये आणि कॅमेऱ्यांमध्ये बंदिस्त करावे. स्वप्रतिमेच्या प्रेमात पडून जीवावर उदार होणे किंवा स्वतःच्या हौसेसाठी इतरांचे आयुष्य पणाला लावणे, या बाबी व्रतसिद्धीतले खूप मोठे अडथळे आहेत, हे ठळकपणे नमूद करणे क्रमप्राप्त आहे, याची कृपया नोंद घ्यावी.  
फक्त, फक्त आणि फक्त आनंदाचं वाण लुटून, नव्या नवलाईची ऊर्जा घेऊन रात्री मुक्कामी आपापल्या घरी यावं. 

काल आपण कशी आणि कित्ती मज्जा केली, या स्मृतींची सुखद सुरावट अंतर्मनात आळवत सोमवारी सकाळी ऑफिसचं  पंचिंग टायमिंग गाठावं .... शनिवारपर्यंत विनातक्रार कामात बुडून जाण्यासाठी! 

असा 'श्रावणी वीकएंड' मनी ध्याईजे-पाविजे. चिंतिलं लाभिजे. मनसोक्त हुंदडण्याची मनकामना दर रविवारी निरनिराळ्या जिवलगांच्या संगतीत निर्विघ्न  पार पाडिजे. सफरनामा कार्यसिद्धी करिजे. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण!
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WYBNCO
Similar Posts
पाऊस सरी तुझ्या सवे पावसात संकोच मनाचा सरला उष्ण चहाच्या घोटामध्ये वेगळा गोडवा उतरलादृष्टी भेटती रोजच होई परी दुरून तुझ्या संगे कुठून न जाणे धिटाई आलीपाहता तूज भिजल्या अंगे माझ्याहूनही रसिक खराहा थेंब दिसे पावसाचाकिती वेळ दडून बसलाआधार घेत कुंतलाचातव हास्याच्या पुढती फिके&nb ...
अवकाळी पाऊस पीक नुकसानभरपाईसाठी दहा हजार कोटींची तरतूद : मुख्यमंत्री मुंबई : राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानाच्या भरपाईसाठी अंतिम आकडेवारी निश्चित होईपर्यंत दहा हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. नुकसानाच्या पंचनाम्याचे निर्देश यापूर्वीच देण्यात आले असून, यंत्रणा पोहोचली नसेल त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी मोबाइलवर
पाऊस... सकाळची जाग येते तीच पावसाच्या आवाजाने. हळूहळू पावसाळी शेवाळी वास नाकात घुमतो आणि डोळे न उघडताही आपल्याला बाहेर पडणारा पाऊस दिसतो! थंड पडलेल्या शहाबादी फरशीवर पाय ठेवताच मणक्यापर्यंत थंडीची शिरशिरी जाते. अंगावरची गोधडी पांघरून ती लयीतली टपटप ऐकत राहावंसं वाटतं...
‘पाऊस न्हाय म्हणून शेतीची कामे थांबवायची का?’ सोलापूर : ‘पावसाचा अजून पत्ताच न्हाय... आत्ता जरी पाऊस पडला, तरी पेरणी करताच येत न्हाय...आकाड सरला की लगीच सरावन लागतूय...अणं सरावनात, तर बैल पोळ्याला ज्वारीची पेरणी करावी लागतीय... यंदाचा ही हंगाम वायाच गेला बघा... पाऊस काशाचा नुसत वारच भकाय लागलय...! आज उद्या पाऊस पडलच की पाऊस न्हाय म्हणून शेतीची

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language